![]() |
| Fear |
भीती म्हणजे काय?
सात प्रकारच्या वैश्विक मानवी भावना असतात. डॉ. पॉल एकमन यांच्या मते क्रोध, तिरस्कार, भीती, आश्चर्य, आनंद, दु:ख आणि अपमान या त्या सात भावना आहेत. भीती ही उत्तेजना किंवा परिस्थितीशी संबंधित असते. भीती एक नैसर्गिक, भक्कम आणि मूलभूत मानवी भावना आहे जी, आपण एखादा धोका असल्याचे जाणवल्यावर अनुभवतो. कधीकधी आपल्या जीवनात वास्तविक परिस्थिती भीती निर्माण करू शकते. अनेकदा आपल्या धोक्यांविषयीचा आगाऊ अंदाज आपल्या मनात भीती निर्माण करू शकतो. संपूर्ण मानवी उत्क्रांती दरम्यान, भीतीने एक मोलाची भूमिका बजावली आहे. एखाद्या धोक्यापासून स्वतःला कसे वाचवावे हे आपण भीतीमुळेच शिकलो आहोत. मनुष्याला जर भीतीच वाटली नसती तर तो स्वतःचे रक्षण करू शकला नसता. जर आपणास नैसर्गिक संकटांची भीती वाटली नसती, तर आपण आपले संरक्षण करण्याचे मार्ग शोधू शकलो नसतो. मानवांनी भीतीला समजून घेऊन, स्वतःला वाचविले आणि जगण्याची साधने व तंत्रे विकसित केली.बऱ्याच परिस्थितींमध्ये आपल्याला व्यासपीठावरून बोलण्याची भीती, लिफ्ट किंवा बंदिस्त ठिकाणी वाटणारी भीती, घरगुती कीटक जसे किडे, उंचीची भीती इत्यादींचा सामना करावा लागतो. या परिस्थितीत बऱ्याच वेळा तत्काळ धोका उद्भवत नाही. परंतु आपल्यातील बऱ्याच जणांमध्ये हे प्रसंग प्रचंड प्रमाणात भीती निर्माण करतात. बरेच लोक अधूनमधून भीतीची उदाहरणे अनुभवतात जसे की अत्यंत महत्त्वाचे सादरीकरण देणे, मुलाखत देणे, एखाद्याला डेट करणे, नवीन लोकांना भेटणे इत्यादी.
उदा. आपल्यापैकी बऱ्याच जणांना सामान्य असणारी भीती म्हणजे व्यासपीठावरून बोलण्याची भीती. आपल्याला बोलण्यापूर्वी चिंता आणि भीती असते. आपले मन आपण कसे बोलू याबद्दलच्या विविध परिस्थितीची कल्पना करण्यास सुरवात करते. अपयशाची भीती जितकी जास्त असेल तितकीच कामगिरी करताना ती अनुभवण्याची शक्यता जास्त.
अपयश म्हणजे काय?
तुम्हाला या जगात कुणी अशी व्यक्ती सापडेल का, जी तिच्या आयुष्यात एका वेळेसही अपयशी ठरली नसेल? उत्तर आहे “नाही”. अपयश न येता जीवन जगणे अशक्य आहे. काही व्यक्ती कमी अपयशी असू शकतात. परंतु त्या व्यक्ती कदाचित अत्यंत सावधपणे जीवन जगात असतील आणि त्यांचे आयुष्य पूर्णपणे जगत नाहीत. हे लोक काहीतरी नवीन करण्यास घाबरू शकतात आणि त्यांच्या जीवनात होणारे बदल टाळत असतात. याव्यतिरिक्त काही व्यक्ती
त्यांच्या आयुष्यात बरेच अपयश अनुभवीत असतील आणि त्यांचे जीवन अधिक अर्थपूर्ण करण्यासाठी प्रयत्न करीत असतात. आपल्यातील बरेच जण जीवनात अडखळतात आणि धडपडतात. कधी आपल्याला नकारांचा सामना करावा लागतो, कधी आपण काही वाईट निर्णय घेतो. तरीही आपण जीवनात खचून जाऊ नये. आपल्या अपयशाला धैर्याने सामोरे जा. आपण अपयशी झाल्यानंतर आणि प्रयत्न करणे थांबवल्यास आपण ज्या संधी गमावणार आहात त्याचा विचार करा.
आपापल्या कारकीर्दीत अपयशी ठरलेल्या लोकांबद्दल विचार करा, त्यांनी हार मानली नाही, ते सर्व प्रयत्न करत राहिले. अयशस्वी होण्यामुळे अनेकदा निराशा, राग, विफलता, दुःख, खंत आणि संभ्रम यासारख्या भावना उद्भवतात. अपयशानंतर लोक अनेकदा स्वत: ला दोष देतात. तसे करणे टाळावे.
अपयश हे बऱ्याच जणांना त्रासदायक ठरू शकते. पण काही लोक त्याकडे 'सुधारण्यासाठी एक संधी' म्हणून बघतात. प्रत्येक वेळी आपल्याया अपयश आल्यास, दोन पर्याय असतात: एक म्हणजे सगळे संपले असे मानून थांबणे आणि दुसरे म्हणजे चुकांमधून शिकून पुढे सरकणे. अपयश आपल्याला जो पर्यंत थांबवू शकत नाही, जो पर्यंत आपण त्याला तसे करण्याची परवानगी देत नाही. अपयश आपल्याला स्वतःबद्दल अधिक जागरूक करते. अपयशाचा सामना केल्यानंतर एखादी व्यक्ती खूप सामर्थ्यवान बनू शकते.
अपयशी होण्याची भीती
आपण सर्व अयशस्वी होण्याची भीती बाळगतो. परंतु अपयशाची भीती म्हणजे, जेव्हा आपण आयुष्यात पुढे जाण्यासाठी प्रयत्न करणे थांबवतो. सतत अपयश पाहून आपल्या मनात भीती निर्माण होते. अनेक वेळा आपल्याला अपयशाची भीती नवीन गोष्टी करण्यापासून परावृत्त करते. हे आपल्याला काहीही न करण्यास भाग पाडू शकते. यामुळे आपण पुढे जाण्यापासून
रोखले जातो.
अपयशी होण्याच्या भीतीची कारणे:
शरम, लज्जा आणि नकाराची भीती यासारख्या काही भावना अयशस्वी होण्याची भीती निर्माण करतात. अयशस्वी होण्याच्या भीतीमागील कारणे खालीलप्रमाणे आहेत:
- आपण ज्या नकारात्मक वातावरणामध्ये राहत आहोत ते अपयशाची भीती आणू शकते.
- ज्याला बालपणात सातत्याने अपमानित केले गेले आहे आणि ज्यावर टीका केली गेली असेल ती व्यक्ती मोठेपणी भीतीसारखी नकारात्मक भावना बाळगू शकते.
- आयुष्यातल्या भूतकाळातील काही कठीण अनुभव हे देखील अपयशाची भीती निर्माण करू शकतात. अनुभव अत्यंत क्लेशकारक आणि विसरायला अवघड असल्यास, आपल्याला इतर गोष्टींमध्ये अयशस्वी होण्याची भीती वाटत राहते.
- अहंकाराला दुखावणाऱ्या अपयशाची नेहमी आपल्याला भीती वाटत असते.
- इतर लोक आपल्याबद्दल काय बोलतात याचा सतत विचार करीत असल्यास.
- जेंव्हा तुमची तुलना एखाद्या परिपूर्ण व्यक्तीशी केली गेली तर तुम्ही स्वत: ला सिद्ध करण्याच्या प्रयत्नांत स्वतःवर दबाव निर्माण करता.
- चुकीचे आत्मविश्वास असलेले लोक अपयशाच्या भीतीमुळे सामान्यत: जोखीम टाळतात.
आपणामध्ये अपयशी होण्याची भीती आहे?
खालील प्रश्नांकडे जा आणि ‘हो’ किंवा ‘नाही’ मध्ये उत्तरे द्या (ही पद्धत वैज्ञानिकदृष्ट्या सिद्ध झालेली नाही आणि त्याची चाचणी केलेली नाही, परंतु हे आत्म-आकलन करण्याचे एक साधन आहे. आपल्या भीतीबद्दल अधिक तपशीलवार विश्लेषणासाठी, आपण नेहमीच तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा)
- इतर लोक आपल्याबद्दल काय विचार करतात याबद्दल आपण सतत काळजी करता का?
- आपण अपयशी ठरल्यास, भविष्यात काय होईल याबद्दल आपण वारंवार काळजी करता का?
- आपण आपल्या अपयशासाठी स्वतःला दोष देता आणि आपल्या क्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण करता का?
- आपण अपयशी ठरल्यास, अपयशासाठी इतरांना दोष देता का?
- आपण वेळोवेळी कामात दिरंगाई करता आणि बऱ्याचदा काम करण्यासाठी “वेळ संपत आहे” असे आपणास वाटते का?
- आपण विनात्वरित गोष्टींमुळे विचलित होता आणि बऱ्याचदा महत्त्वाच्या कामांकडे दुर्लक्ष करता.
- काम पूर्ण करण्यापूर्वी आपल्या मनात नेहमीच नकारात्मक परिणाम असतात काय? (मी काम पूर्ण करू शकणार नाही असे विचार)
- आपण नवीन गोष्टी किंवा आव्हानात्मक कामे टाळत राहता का?
- आपण ज्या गोष्टी परिपूर्ण आणि यशस्वीरित्या पूर्ण करू शकता फक्त त्याच गोष्टींसाठी आपण प्रयत्न करीत आहात का?
- भूतकाळातील अपयशाच्या अनुभवांमुळे नवीन गोष्टी टाळण्याचा प्रयत्न करता आहात का?
जर वर तुम्हाला ६ पेक्षा जास्त नाही मिळाले तर कदाचित तुमच्यामध्ये अपयशी होण्याची भीती असू शकते, ज्यामुळे कदाचित तुम्ही स्वतःचे जीवन अधिक अर्थपूर्ण मार्गाने जगायला प्रतिबंध करीत आहात.
अपयशी होण्याच्या भीतीवर मात करणे
अपयशाची भीती ही नकळत घडत असल्याने, एक काळजीपूर्वक नियोजित विचार प्रक्रिया तयार करणे आवश्यक आहे. अपयशाच्या भीतीवर मात करण्यासाठी पुढील काही टीप आहेतः
- आपल्या भीतीची जाणीव करून घ्याः आपली भीती स्वीकारा आणि अशी विश्वासू व्यक्ती शोधा ज्यांच्याशी आपण भीतीची भावना व्यक्त करू शकता.
- अपयशाच्या भीतीचे मूळ कारण शोधा. ते लिहा आणि इतरांच्या दृष्टिकोनातून समजून घ्या.
- आपली उद्दिष्टे स्पष्टपणे परिभाषित करा: अशी उद्दिष्टे ठेवा की, ज्याद्वारे आपण सकारात्मक परिणाम साध्य करू इच्छित आहात किंवा जे अवांछित परिणाम टाळण्यासाठी आहेत.
- सकारात्मक विचार करा: आपल्या अंतर्गत विचार प्रक्रियेचा थेट परिणाम आपल्या प्रतिक्रियेवर आणि वर्तनांवर होतो. आपल्या स्वतःबद्दलच्या नकारात्मक बोलण्यावर मर्यादा घाला. नकारात्मक विचारांना आपल्याबद्दल आणि परिस्थितीबद्दलच्या सकारात्मक विचारांनी बदला.
- आपल्या निर्णयांमुळे होण्याऱ्या परिणामांची कल्पना करा: भविष्यात काय होईल याबद्दलची असणारी अनिश्चितता, चिंता निर्माण करू शकते. चांगल्या आणि वाईट परिणामांची कल्पना करा, जी नंतर आपल्याला कशालाही तोंड द्यायला मानसिकरित्या तयार करेल.
- सर्वात वाईट-परिणामाच्या परिणामाबद्दल सविस्तर विचार करा: सर्वात वाईट परिस्थितीच्या परिणामाची व्याख्या करा, जेणेकरून आपणास समजेल की अपयश कायमस्वरूपी नसते.
- कुठल्याही परिणामांमधून काही तरी नवीन शिकण्याची वृत्ती ठेवा: आपल्या इच्छेनुसार गोष्टी होणार नाहीत, परंतु याचा अर्थ असा नाही की आपण अयशस्वी झाला आहात. स्वतःला विचारा की यामधून आपल्याला शिकण्यासारखे काय आहे? सकारात्मक काय आहे? आणि मी पुढे काय करू शकतो?
- आकस्मिक योजना तयार ठेवा: एक आकस्मिक योजना तयार करा जी आपल्याला योग्य जोखीम घेण्यास अधिक आत्मविश्वास देईल. नेहमी समस्येचा सामना करण्याचे अनेक मार्ग आहेत हे लक्षात ठेवा. बॅकअप योजना असल्यास अपयशाची भीती कमी होईल.
अपयशाची भीती आपल्या क्षमतांमध्ये आपल्या जीवनात काहीतरी साध्य करण्यापासून रोखू शकते. ह्या भीती मागे अनेक कारणे आहेत आणि या अपयशाची भीतीवर मात करण्यासाठी भरपूर मार्ग आहेत. नेहमी लक्षात ठेवा अपयश हि यशाची
पहिली पायरी असते.
थॉमस ए. एडिसन यांचे प्रसिद्ध उद्दगार लक्षात ठेवाः “मी अयशस्वी झालो नाही. मला नुकतेच १०,००० मार्ग सापडले आहेत जे कार्य करणार नाहीत.”
प्रा. अतुल फेगडे
To read
this article in English click here: https://profatulfegade.wordpress.com/2020/08/09/how-to-overcome-fear-of-failure/
संदर्भ:
1) Fritscher Lisa, What is
Fear? www.verywellmind.com (https://www.verywellmind.com/the-psychology-of-fear-2671696)
accessed on 8/8/2020 at 12.30pm.
2) PaulEkmanGroup, Universal
Facial Expressions, www.paulekman.com (https://www.paulekman.com/resources/universal-facial-expressions/)
accessed on 8/8/2020 12.40pm.
3) Phobias and Irrational
Fears, www.helpguide.org, (https://www.helpguide.org/articles/anxiety/phobias-and-irrational-fears.htm)
accessed on 8/8/2020 1.20pm.
4) MindTools, Overcoming Fear
of Failure - Facing Your Fear of Mo/ving Forward, (https://www.mindtools.com/pages/article/fear-of-failure.htm)
accessed on 8/8/2020, 4.15pm.
5)
Ho Leon, Why You
Have the Fear of Failure (And How to Overcome It), 12/5/2020, www.lifehack.org,
(https://www.lifehack.org/articles/lifehack/how-fear-of-failure-destroys-success.html)
accessed on 8/8/2020 at 4.30pm
6)
Anastacia, Fear
of Failure, 19/6/2017, (https://www.bloomsandsmiles.com/fear-of-failure/)
accessed on 8/8/2020 at 5.05pm
7) Peppercorn Susan, How to Overcome Your Fear of Failure, 10/12/2018, Harvard Business Review, (https://hbr.org/2018/12/how-to-overcome-your-fear-of-failure) accessed on 8/8/2020 at 7.12pm





