आपण कम्फर्ट झोनविषयी आधीच चर्चा केली आहे आणि मागील लेखात आपल्याला कम्फर्ट झोनमध्ये राहायला का आवडते याविषयी सविस्तर विवरण केलेले आहे. या लेखात कम्फर्ट झोनमधून बाहेर येण्यासाठी काय करता येईल ते पाहू या.
आपले विचार
सहसा आपल्या अनुभवांमुळे आणि आपल्या समजुतींवर अवलंबून असतात. आपल्यावर जुन्या आणि सवयीच्या
भावनांचे नियंत्रण असते. अनेकदा या भावना आपल्या कम्फर्ट झोनमधल्या असतात आणि
त्यामुळे आपल्याला सर्वोत्तम कामगिरीच्या क्षेत्रात जाण्यापासून रोखलं जातं. या
जुन्या विचारांमुळे कम्फर्ट झोनचे कुंपण निर्माण होते आणि ते ओलांडणे धोकादायक आहे असे आपल्याला वाटते.
अनेकदा नव्या विचारसरणीची अस्वस्थता आणि होणारे बदल टाळण्यासाठी अनेक सबबी सांगितल्या जातात. यामुळे अनेकदा चालढकल करण्याची सवय लागते आणि आपण नवीन गोष्टी टाळायला लागतो.
कम्फर्ट झोनमधून बाहेर येण्यासाठी खालील काही सूचनांबद्दल बोलूया:
तुमच्या सवयी
समजून घ्या आणि बदला
आपण आपल्या
अनुभवावर आधारित आपोआप किंवा सवयींप्रमाणे वागत असतो. पूर्वी जेव्हा तुम्ही
एखाद्या विशिष्ट परिस्थिती यशस्वीपणे हाताळली असेल, तेव्हा
तुम्ही पुढच्या वेळी त्याच प्रतिसादाचा उपयोग करता आणि नंतर एखादे काम करण्याची
तीच सवय लागते. आपण आपल्या
सवयींचे स्वरूप समजून घेतले पाहिजे आणि विचार करण्याचे आणि काम
करण्याचे नवे मार्ग
शोधले पाहिजे. सवयी सहसा आपल्याला नवीन काम आणि कल्पना निर्माण करण्यापासून रोखतात.
जेव्हा नवीन कल्पना नसते, तेव्हा शिकणे थांबते आणि कोणत्याही होण्याऱ्या बदलाला विरोध
केला जातो.
स्वत:ला थोडा
वेळ द्या आणि अंतर्मुख व्हा
आपल्यापैकी
बहुतेकांना नेहमी असे वाटते की, आपण चांगले, दयाळू, बुद्धिमान आणि काळजीवाहू लोक
आहोत. काही परिस्थितीत आपल्याला याउलट वाटते. कधीकधी ते खरं असतं, पण नेहमीच
नसतं. आपल्या अनेक प्रतिक्रिया परिस्थितीजन्य असतात. परिस्थितीनुसार आपले वर्तन
बदलते. स्वतःबद्दल काय खरं आहे याबद्दल स्वतःला विचारा? तुमच्या लक्षात येईल की
तुम्ही विचार करता तितके चांगले नाही किंवा फारसे वाईट ही नाही. तुम्ही जसे आहात
तसे कृपाळूपणाने स्वीकारा.
केवळ
नुकसानीवर लक्ष केंद्रित करू नका
नवीन गोष्टींना प्रतिकार करणे हे सहसा
नुकसानीच्या भीतीमुळे असतो. नुकसानीच्या भावनेमुळे आपल्याला काहीतरी नवीन आणि
नावीन्यपूर्ण करण्यास मज्जाव होतो. आपण फक्त नुकसानीचे धोकादायक चित्र बघत असतो. त्यामुळे
कम्फर्ट झोनमधून बाहेर पडण्याऐवजी आपण आपल्या सहनशीलतेची मर्यादा वाढवण्याचा प्रयत्न करतो. कम्फर्ट
झोनमध्ये राहून विकास साधणे कठीण आहे. आपल्या जीवनात कोणतीही अडचण नसली तरी आपण
नेहमी कम्फर्ट झोनमधून बाहेर येण्याचा विचार केला पाहिजे.
तुम्हाला
आव्हान देणारे आणि पाठिंबा देणारे लोक शोधा
तुम्हाला अशा
लोकांची गरज आहे जे तुम्हाला नेहमीच आव्हान देऊ शकतात. पण आपल्याला अशा लोकांच्या
सहवासाची गरज आहे जे आपले काम समजत नसले तरी ही आपल्याला आधार देऊ शकतात. कधीकधी
आपल्याला आपल्या आजूबाजूला नवीन माणसं आणावी लागतात.
आपल्या मनात स्वतःला मर्यादित करणारे बरेच विचार असतात, जसे की, 'मी पुरेसा हुशार नाही.' मला फारसा अनुभव
नाहीये.' "आता बदल घडवायला खूप उशीर झाला आहे". हे विचार आपल्याला अनेकदा
जोखीम घेण्यापासून आणि नव्या संधी शोधण्यापासून रोखतात. या सर्व समजुती असतात. परंतु समजुत ही आपण
गृहीत धरलेली असून ती वस्तुस्तिथी नसते. तुमच्या विचारांना आणि समजुतींना आव्हान द्या. जीवनातील धाडसी बदल स्वीकारा. सर्वोत्तम
कामगिरी च्या क्षेत्रात स्वतःला ताणून धरा पण त्याचा अतिरेक करू नका.
इम्पोस्टर
सिंड्रोम टाळा
इम्पोस्टर
सिंड्रोम हा एक असा भ्रम असतो ज्यामुळे आपल्याला वाटते की आपण प्रतिभा आणि पात्रतेमुळे नव्हे तर
नशिबामुळे यशस्वी झालो आहोत. हे सहसा खरं नसतं. यात आपण जे केले नाही त्यावर आपण
लक्ष केंद्रित करत राहतो. आपण आपल्या क्षमतांवर विश्वास ठेवला पाहिजे आणि त्याचा
उपयोग आपल्या फायद्यासाठी केला पाहिजे. आपल्या क्षमतांवर भरवसा ठेवल्याने आपल्याला
कम्फर्ट झोनमधून बाहेर पडण्यास मदत होते.
मोठी स्वप्ने
पाहा
चांगली
कामगिरी मिळवण्यासाठी थोडीशी चिंता नेहमीच चांगली असते. पण अति चिंतेमुळे तणाव
निर्माण होतो आणि त्याचा अनावश्यक परिणाम होतो. आपण मोठी स्वप्ने पाहिली पाहिजेत,
पण ती स्वप्ने पूर्ण करण्यासाठी छोटी छोटी पावले उचलली पाहिजेत. प्रत्येक वेळी
छोटी पावले उचला आणि दीर्घकाळ ते करत राहा. महाकाय झेप घेण्यापेक्षा
कालांतराने हळूहळू सुधारणा करणे नेहमीच चांगले असते.
लक्षात ठेवा,
नवीन गोष्टी करून पाहण्यासाठी कम्फर्ट झोनमधून बाहेर येणे सर्वात महत्त्वाचे आहे.
स्वतःशी म्हणत राहा, "मी नवे अनुभव गोळा करत आहे आणि प्रत्येक नव्या अनुभवाने मी स्वतःला
समृद्ध करत आहे.” जर तुम्ही तुमचा कम्फर्ट झोन तोडू शकत नसाल तर त्याचा विस्तार करत राहा.
प्रा. अतुल फेगडे
To read this article in
English click here: https://profatulfegade.wordpress.com/2020/09/19/how-to-break-away-from-comfort-zone/
संदर्भ:
Ho Leon, Lifehack, How
to Break Out of Your Comfort Zone, 5/5/2020, https://www.lifehack.org/articles/featured/how-to-break-out-of-your-comfort-zone.html
accessed on 19/9/2020 at 3.55pm
Schwartz Mel,
Psychology Today, Breaking Free From Your Comfort Zone, 08/08/2011, https://www.psychologytoday.com/us/blog/shift-mind/201108/breaking-free-your-comfort-zone
accessed on 19/9/2020 at 3.21pm















