Showing posts with label Digital Awareness. Show all posts
Showing posts with label Digital Awareness. Show all posts

Sunday, August 23, 2020

डिजिटल पाकीटमारांपासून सावध व्हा


पूर्वी बस थांबे, रेल्वे स्टेशन, बाजारपेठा इत्यादी गर्दीच्या ठिकाणी पाकीटमार अतिशय सक्रिय असत. ते अनेक युक्त्या लढवून, लक्ष वळवून मौल्यवान वस्तू चोरत असत. आता त्यांना लोकांनाची फसवणूक करण्यासाठी इंटरनेट नामक एक नवीन माध्यम सापडले आहे. इंटरनेट ह्या आभासी जगाच्या उदयाबरोबर डिजिटल पाकीटमारीचाही उदय झाला आहे. काही वेब सीरिजमध्ये दाखवल्याप्रमाणे हा अनेकांसाठी व्यवसाय बनला आहे. या लेखात यूपीआय वापरताना काही सामान्य प्रकारच्या डिजिटल पैश्याच्या व्यवहारातील फसवणुकीचे प्रकार जाणून घेऊया.

डिजिटल व्यवहार करणाऱ्या साधनांचा अनेक लोक अवलंब करत आहेत. ह्या वव्यवहारांच्या वाढत्या वापरांमुळे भारतातही सायबर हल्ले आणि फसवणुकीचे प्रमाण वाढलेले आहे. जशी डिजिटल व्यवहाराची प्रक्रिया अतिशय सोपी आहे, ती तितकीच धोकादायकही आहे. डिजिटल व्यवहार प्रणाली वापरताना तुम्ही व्यवस्थित लक्ष नाही दिले तर तुमची सहज फसवणूक होऊ शकते. ऑनलाइन फसवणूक करणारे, लोकांना आकर्षित करून त्यांची फसवणूक करण्याचे अनेक मार्ग काढत आहेत. YouGov आणि ACI Worldwide ने केलेल्या एका अभ्यासात जवळजवळ ५० टक्के वापरकर्त्यांनी वाढत्या डिजिटल व्यवहारातील फसवणुकीबद्दल चिंता व्यक्त केली आहे. काही युक्त्या अतिशय सोप्या असतात आणि त्या अगदी सहजपणे टाळता येतात.


यूपीआय (युनिफाइड पेमेंट्स इंटरफेस) हा आज भारतात पैसे हस्तांतरित करण्याचा सर्वात सोपा आणि जलद मार्ग आहे. अलीकडे डिजिटल पाकीटमार यूपीआय व्यवहारांना अधिकाधिक लक्ष्य करत आहेत. फसवणूक करणाऱ्यांनी वापरलेल्या सर्वात सामान्य पद्धती खालीलप्रमाणे आहेत:

1)  बनावट यूपीआय पेमेंट लिंक्स:


फसवणुकीचा सर्वात सामान्य मार्ग म्हणजे वापर कर्त्यांना फसव्या लिंक पाठवणे आणि त्यामाध्यमातून पैसे चोरणे. पाकीटमार पीडितेला डिजिटल वॉलेट/यूपीआय अॅपवरून मोबाइल क्रमांकावर १० रुपये नाममात्र रक्कम हस्तांतरित करण्यास सांगतात. ही लिंक सामान्यतः मोबाइलवर एसएमएसद्वारे पाठवली जाते. पीडित व्यक्ती लिंक वर क्लिक करते आणि बँकेच्या वेबसाइटसारखी बनावट वेबसाइट उघडते. वापरकर्त्याने क्लिक केल्यानंतर मोबाइलमध्ये यूपीआय अॅप उघडण्याची परवानगी मागितली जाते. ही लिंक कधीकधी पीडितेला यूपीआय आयडी आणि ओटीपी किंवा यूपीआय पिन नंबर सारखी महत्त्वाची माहिती प्रविष्ट करण्यास सांगते. एकदा ही माहिती प्रविष्ट केल्यानंतर, पुढच्या मिनिटाला पीडितेला त्याच्या खात्यातून हस्तांतरित केलेल्या पैशांबद्दल मेसेज येतो पण तोपर्यन्त उशीर झालेला असतो. डिजिटल पाकीटमार तुमचे ओळखपत्र आणि पिन वापरून 3-4 व्यवहाराद्वारे पैसे ट्रान्सफर करतात आणि खात्यातील सगळे पैसे लंपास करतात. अश्या बनावट लिंक्स तुमच्या डिव्हाइसला व्हायरस किंवा मालवेअरने संक्रमित करू शकतात. जे तुमची माहिती चोरू शकतात आणि फसवे व्यवहार करू शकतात.

आपण यातील काही प्रकारांकडे लक्ष देऊ या:


1)  'तुमच्या केवायसीची मुदत संपली आहे' पीडित व्यक्तीस असा फोन किंवा एसएमएस येतो, आणि तुमचे खाते ब्लॉक केले जाईल असे सांगण्यात येते. फसवे लोक तुम्हाला मोबाइल क्रमांक, ईमेल आयडी, नाव, यूपीआय आयडी, कस्टमर आयडी, पिन क्रमांक इत्यादी. माहिती सांगण्यास भाग पाडतात.

2)  सोशल मीडियावरील बनावट यूपीआय पोर्टल: फेसबुक आणि ट्विटरसारख्या साइट्सवर अनेक बनावट खाती आहेत की जी खरी भासतात. असे अनेक फसवे यूपीआय हँडल्स आहेत. सोशल मीडिया पेजेसवर कोणतीही संपर्काची माहिती टाकू नये. काही लोकांना प्रत्युत्तर देतांना किंवा चॅट करतांना मोबाइल क्रमांक आणि ई मेल आयडी लिहिण्याची सवय असते. काही लोक यूपीआय अॅपवर व्यवहाराचे स्क्रीनशॉट्स घेतात आणि फेसबुक आणि ट्विटरसारख्या साइट्सवर पोस्ट करतात. ही माहिती डिजिटल पिकपॉकेट सहज चोरून उपयोगात आणतात.

3)  गुगल प्ले स्टोअर किंवा अॅपल अॅप स्टोअरवरील बनावट अॅप्स: आपल्या डिव्हाइसवर डाउनलोड केलेल्या मोबाइल अॅप्सबद्दल जागरूक राहा. हे अॅप्स मागत असलेल्या परवानग्यांकडे लक्ष द्या.  आपण या स्टोअर्समधून अस्सल अॅप डाउनलोड करत आहात याची खात्री करा. अॅप डाउनलोड करण्यापूर्वी, वापर कर्त्यांनी लिहिलेल्या समीक्षा वाचा. 

4)  पैश्यांची मागणी करण्याऱ्या लिंक पाठवणे: फसवणूक करणारे जण ग्राहकांना पैश्यांची मागणी करण्याऱ्या लिंक पाठवतात. एकदा पीडित व्यक्तीने पैसे जमा होईल असे गृहीत धरून लिंक वर क्लिक केले की रक्कम जमा होण्याऐवजी खात्यातून काढली जाते.

5)  जुन्या वस्तू ऑनलाइन विकणे: जेव्हा तुम्ही जुन्या वस्तू ऑनलाइन विकण्यासाठी टाकता, तेव्हा तुम्हाला संभाव्य खरेदीदाराचा फोन येतो. खरेदीदार तुमच्याशी वाटाघाटी करतो. काही आगाऊ भरणा करण्यासाठी तो तुमचा यूपीआय आयडी मागतो. पुन्हा फोन करतो की काही त्रुटी आहे आणि तुम्हाला तुमच्या मोबाइलवरती यूपीआय अॅपमध्ये त्याचा यूपीआय आयडी प्रविष्ट करण्यास सांगतो. ते पूर्ण होताच तुमच्या खात्यातून पैसे लगेच वजा होतात.

6)  एसएमएस पुढे पाठविण्याचा घोटाळा: परतावा किंवा कॅशबॅकची प्रक्रिया प्रमाणित करण्यासाठी घोटाळेबाज तुम्हाला तुमच्या फोनवरून संदेश पाठवायला सांगेल. एसएमएसमध्ये अक्षरांक ओळखकर्ता (alphanumeric identifier) कोड असतो ज्यामुळे फसवणूक करणार्‍याला त्याच्या डिव्हाइसवर आपल्या मोबाइल क्रमांकासह यूपीआय अॅपची नोंदणी करता येते. घोटाळे बाज वापरकर्त्याला पिन नंबर देणे किती जरुरी आहे हे पट‍वून देतो आणि तुमच्या खात्यातून फसवणूक करून पैसे हस्तांतरित करतो.

7)  गुगलवर कस्टमर केअर नंबर शोधणे: बनावट नंबर असलेल्या अश्या अनेक बनावट साइट्स आहेत. तुम्ही बनावट कॉल सेंटरला फोन केल्यावर फसवेगिरीला बळी पडू शकता. जर तुम्हाला खरोखरच कस्टमर केअरशी संपर्क साधायचा असेल तर तक्रार नोंदवण्यासाठी मूळ अॅपचा वापर करा.


Add caption

लक्षात ठेवण्या जोग्या काही महत्त्वाच्या पूर्वसूचना:


·         अज्ञात वापरकर्त्यांनी पाठविलेल्या कोणत्याही लिंकवर कधीही क्लिक करू नका.

·         अधिकृत भीम किंवा बँक यूपीआय अॅप्सच्या माध्यमातूनच आपले व्यवहार पूर्ण करा.

·         पिन नंबरसारखी गोपनीय माहिती मागणाऱ्या कोणावरही विश्वास ठेवू नका. ते कोणत्याही परिस्थितीत शेअर करू नका. बँक किंवा डिजिटल वॉलेट कंपन्याही त्याची मागणी कधीच करत नाहीत.

·         वन टाइम पासवर्ड (ओटीपी) क्रमांक अतिशय गोपनीय माहिती आहे. हा कधीही कोणालाही सांगू नका. हा क्रमांक कोणत्याही लिंकमध्ये प्रविष्ट करू नका. व्यवहार करताना फक्त अधिकृत अॅप्समध्ये त्याचा वापर करा.

·         मोफत भेटवस्तू किंवा बक्षिसे असल्याचा दावा करणाऱ्या कोणत्याही लिंकवर क्लिक करू नका.

·         तुमच्या बँकेत होणाऱ्या व्यवहारांचा मागोवा घ्या. बँककडून तुम्हाला मिळणाऱ्या संदेशांचे काळजीपूर्वक परीक्षण करत राहा.

·         शक्य असल्यास ‘Any Desk’सारख्या स्क्रीन मिररिंग अॅप्सना तुमचा स्क्रीन शेअर करण्याची परवानगी देऊ नका.

·         यूपीआय अॅप्सवर 'देयक' आणि 'प्राप्त' पर्याय काळजीपूर्वक तपासा.

·         तुमचा पिन नंबर वेळोवेळी बदलत राहा.

आपण व्यवस्थित काळजी घेतली आणि कोणताही व्यवहार करताना जागरूक राहिलो तर निश्चितच स्वतःला अश्या धोक्यांपासून वाचवू शकतो.    

 



प्रो. अतुल फेगडे

 

To read this article in English click here: https://profatulfegade.wordpress.com/2020/08/23/beware-of-digital-pickpockets/

 

संदर्भ:

  1. ACI Universal Payments, Nearly Half of Indian Consumers Are More Concerned About Risk of Payments Fraud Due to COVID-19 Crisis, 13/5/2020, (https://www.aciworldwide.com/news-and-events/press-releases/2020/may/nearly-half-of-consumers-are-more-concerned-about-risk-of-payments-fraud-due-to-covid-19-crisis) accessed on 22/8/2020 at 7.45pm
  2. Shaikh Zoaib Saleem, Do not fall victim to new tactics used to steal money through UPI, 30/6/2019, (https://www.livemint.com/news/india/do-not-fall-victim-to-new-tactics-used-to-steal-money-through-upi-1561879313342.html) accessed on 22/8/2020 at 7.50pm
  3. Navneet Dubey, ET Online, Beware of these 4 frauds while making payments via UPI amid lockdown. (https://economictimes.indiatimes.com/wealth/save/beware-of-these-6-frauds-while-making-payments-via-upi-amid-lockdown/articleshow/75671798.cms?utm_source=contentofinterest&utm_medium=text&utm_campaign=cppst) accessed on 22/8/2020 at 7.55pm
  4. Preeti Kulkarni, ET Bureau, 8 digital payment related scams and how you can avoid them, 14/12/2019, (https://economictimes.indiatimes.com/wealth/save/8-digital-payment-related-scams-and-how-you-can-avoid-them/articleshow/71863864.cms?from=mdr) accessed on 22/8/2020 at 8.25pm
  5. Team91, Beware! These 7 Google Pay and PhonePe scams will let hackers steal your money, 20/5/2020, (https://www.91mobiles.com/hub/upi-scam-google-pay-phonepe-cashback-request-money-sim-cloning/) accessed on 22/8/2020 at 8.25pm